“२०१४ पासून अचानक देशात भयंकर असहिष्णुता पसरली आहे !! अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. एवढंच काय तर इतिहासाचे भगवेकरण करून सगळा इतिहास बदलला जात आहे !!! यापूर्वी असे अत्याचार आणि असे खोटे इतिहासलेखन फक्त १९९९८ ते दरम्यान झाले होते, नाही का ? काय कारण आहे बरं ?? सोप्पं आहे... त्या काळात आम्हाला हवी तशी इतिहास आणि संस्कृतीची मांडणी करणारे सरकार सत्तेत नव्हते. आपला देश कसा सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन गुण्यागोविंदाने नांदत होता, मुघल राजांनी कला, साहित्य यांच्या माध्यमातून हा देश सांस्कृतिकदृष्ट्या कसा समृद्ध केला, हिंदू धर्मात फक्त आणि फक्त विषमताच कशी होती या गोष्टी या दोन्ही कालखंडातली सरकारे सांगतच नाहीयेत हो ! मग काय करायचं ? चला पुरस्कार परत करूया !! आता उठवू सारे रान !!!...” हा आहे अनेक ‘विचारवंत’, ‘इतिहासकार’ यांचा गेल्या ३ वर्षांतला पवित्रा. ही मंडळी नक्की आहेत कोण, त्यांची विचारपद्धती कशी आहे याबद्दल तपशिलात जाणून घेतलं तरच त्यांच्या वक्तव्यांमागचा हेतू स्पष्ट होऊ शकतो. अशा ख्यातनाम इतिहासकारांच्या उद्योगांचा, पद्धतशीरपणे विणलेल्या जाळ्यांच्या लेखाजोखा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण शौरी यांचं ख्यातनाम इतिहासकार हे पुस्तक.
इस्लामी अत्याचारांकडे कानाडोळा आणि पण हिंदू जातीसंघर्षावर टीका
स्वतंत्र भारतात Indian Counsel For Historical Research (ICHR) या संस्थेवर कायमच डाव्या इतिहासकारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून विशिष्ट विचारांची भलावण केलीच पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधूनही रेटून सोयीस्कर इतिहास मांडला, कारण पाठयपुस्तक मंडळातही त्याच विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता. ‘आपापसात भांडणं होतील, संघर्ष होईल अशा ऐतिहासिक तपशिलांना पाठ्यपुस्तकांमधून वगळण्याचे’ डाव्या इतिहासकारांचे धोरण राहिले आहे. त्याचीच परिणती म्हणून मुस्लीम राजसत्तांच्या कार्यकाळात काळात झालेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणांचे उल्लेखच पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात आले. पुस्तकातल्या ‘एक परिपत्रक’ या प्रकरणात अशा कारनाम्यांचे धक्कादायक तपशील दिले गेले आहेत. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारच्या कार्यकाळात ‘माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक १९८९ साली काढले होते.
त्याद्वारे काय काय फेरबदल करण्यात आले बघा हे उदाहरणादाखल पहा:
१) भारतवर्षे इतिहास या डॉ नरेंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या पुस्तकातून ‘सुलतान महमुदाने मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट, विध्वंस व धर्मांतर करण्यासाठी बाळाचा वापर केला’ या वाक्यातील ‘हत्या आणि धर्मांतर’ हे वगळणे.
२) ‘त्याने सोमनाथ मंदिरातील २ कोटी दिरहाम जवाहिरांची लुटालूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवली’ यातील ‘शिवलिंगाची पायरी बनवली’ हे गाळून टाकणे.
अशी २५-३० उदाहरणं इथे दिली आहेत
‘संघर्ष टाळण्यासाठी हे केले’ हे धोरण म्हणून ऐकायला उदात्त वाटते. पण इतिहासाच्या दुसऱ्या अंगाबद्दल जेव्हा लिहिले जाते तेव्हा मात्र डाव्या इतिहासकारांकडून एक चलाखी केली जाते. मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचारांवर जाणीवपूर्वक पांघरुण घालणारे हे ख्यातनाम इतिहासकार भारतातील जातिव्यवस्थेमुळे गतकाळात जो परस्पर संघर्ष झाला त्याबद्दल मात्र अगदी तपशीलवार वर्णनं पाठ्यपुस्तकामधून अगदी जोरकसपणे देत असतात. जातीपातीमुळे हिंदू धर्म कसा वाईट होता हे बिंबवले की त्या तुलनेत इस्लाम हा धर्म कसा उजवा ठरतो (कारण त्यात म्हणे जातीभेद नाहीत !) हेही बेमालूमपणे सांगितले जाते. शिवाय एकदा का उच्चवर्णीय विरुद्ध दीनदलित दुबळे यांच्यातला संघर्ष ठळकपणे मांडला की तेच मनावर बिंबवल्या गेलेल्या तरुण मंडळींना हळूहळू हा मार्क्सने मांडलेल्या ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशा वर्गविभागणीकडे, त्यांच्या आपापसातल्या संघर्षाकडे आणि अंतिमतः ‘न्याय्य हक्कासाठी हिंसाचार क्षम्य असतो’ या लाडक्या तत्वज्ञानाकडे नेणे सोपे असते. यातूनच मग ‘रशिया झारशाहीच्या तावडीतून कसा मुक्त झाला, आणि या क्रांतीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना कशी झाली याचेही romantic चित्र उभं करायचं, पण याच डाव्या हुकुमशहांच्या राज्यात लाखो लोक कसे बळी गेले याबद्दल चकार शब्द काढायचा नाही, इतकंच काय पण भारतातल्या कम्युनिस्ट सरकार असलेल्या राज्यांमधल्या पक्षपुरस्कृत हिंसाचाराबद्दल मिठाची गुळणी धरायची हा ढोंगीपणा ख्यातनाम डाव्या इतिहासकारांनी वर्षानुवर्षे चालवला आहे.
प्राचीन काळातील भारतीय कर्तृत्वाला श्रेय नाही
मुळात आपल्याइथले डावे इतिहासकार मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या चष्म्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे पाहत असल्यामुळे इथला संघर्ष ते कायमच ठळकपणे मांडतात पण हिंदू संस्कृतीतून उदयास आलेले साहित्य, वैज्ञानिक शोध इ. सकारात्मक बाबींविषयी मात्र कुचकुचत लिहितात. उदा. या पुस्तकातले "कदाचित , बहुतेककरून, संभाव्यपणे... म्हणून" या नावाचे प्रकरण पूर्णपणे याच विषयाला वाहिलेले आहे. इतिहासकार डी. एन. झा यांच्या ‘Ancient India, an introductory outline’ या पुस्तकातल्या खोडसाळबद्दल आपल्याला विस्ताराने कळते. जिथे काही ऐतिहासिक तथ्ये नाकारणे अशक्यच आहे तिथे ते मान्य करायचे पण त्याचे इथल्या विचारपद्धतीला श्रेय मात्र द्यायचे नाही हा भारतातल्या डाव्यांचा खाक्या, म्हणूनच आर्यभट्टाने मूलभूत सिद्धांत मांडले असे कबूल करायचे पण लगेच "ते इथल्या तोपर्यंतच्या विचाराच्या विरुद्ध होते" असे म्हणायचे किंवा कालिदासाच्या साहित्याबद्दल “त्याने जे मांडले तो आधीच्याच शैलीचा विकास होता” अशी मखलाशी करून कालिदासाचीसुद्धा 'ऑल्सो रॅन' गटात गणती करून टाकायची. थोडक्यात काय तर इथे असलेल्या चांगल्या गोष्टी कुठल्यातरी दुसऱ्याच कारणांमुळे घडल्या असं म्हणायचं आणि वाईट गोष्टींना मात्र धर्माचे अधिष्ठान कसे होते हेच उच्चरवाने सांगायचं. तीच गोष्ट अन्य धर्मियांच्या राजवटीत घडली असेल तर तिची रंग सफेदी करून टाकायची (उदा. 'मौर्य काळात जमा होणाऱ्या करातून करवसुली करणाऱ्यांना पोसले जायचे' असे म्हणायचे पण 'औरंगजेबाचा जिझिया कर मात्र हिंदूंना सुरक्षितपणे जगण्यासाठी होता' असे म्हणून भलावण करायची) असे उद्योग इथे निर्लज्जपणे चालले. (विशेष म्हणजे डाव्या इतिहासकारांच्या सर्व निष्ठा ज्या रशियाच्या चरणी वाहिल्या होत्या त्या देशातल्या The History of India या पुस्तकात मात्र प्राचीन काळातल्या भारताच्या अनेक क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल मोकळेपणाने कबुली दिली आहे, असे अरुण शौरी नमूद करतात. याचाच अर्थ भारताच्या इतिहासाच्या सोयीस्कर मांडणीत भारतातल्या डाव्या इतिहासकारांचे वैयक्तिक हितसंबंध देखील गुंतले असले पाहिजेत)
डाव्या इतिहासकारांनी उकळलेले आर्थिक फायदे
याच वैयक्तिक हितसंबंधांबद्दल पुस्तकाच्या 'ते इतिहासकार' या पहिल्या विभागात विस्ताराने लिहिले आहे. एकमेकांची तळी उचलून धरत आपल्याच गोटातल्या इतिहासकारांची वर्णी लावण्याचे काम अनेक डाव्या इतिहासकारांनी केले. शिवाय मोठ्या संशोधन प्रकल्पांवर नेमले गेल्यावर त्यात कसा वेळकाढूपणा केला गेला "मानधन घेत नाही" अशा वल्गना करून प्रत्यक्षात मात्र अनुदान पदरात पडून घेतले, सरकारी खर्चाने परदेश दौरे पदरात पडून घेतले, (एवढे करूनही काही प्रकल्प पूर्ण झाले नाहीतच !) याबद्दल साधार विवेचन अरुण शौरी यांनी या विभागात केले आहे. वैचारिक आणि आर्थिक दोन्ही स्वरूपाचा भ्रष्टाचार करण्याची हिम्मत करणारे ख्यातनाम इतिहासकार अनेक महत्वाच्या पदांवर सरकारी कृपेने राहिले हे आपल्या देशाचे दुर्दैव. रोमिला थापर, इरफान हबीब, सतीशचंद्र, के. एन. पणिक्कर इ. मंडळींनी फेरफार केलेल्या इतिहासाचे देशाच्या काही पिढ्यांवर संस्कार केले आहेत. त्याच मुशीतुन घडलेले आजचे अनेक 'विचारवंत' आणि 'इतिहासकार' आज 'इतिहासात होणाऱ्या ढवळाढवळी'बद्दल सरकारवर आरोप करतात तेव्हा त्या खोटारडेपणाला सीमा नसते. उदारमतवादाच्या मुखवट्याआडचे त्यांचे चेहरे जाणून घेण्याच्या दृष्टीने अरुण शौरींच्या या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे.
रसभंग करणारा अनुवाद
प्रस्तुत मराठी अनुवाद तपशिलाच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी तो अनुवाद न वाटता शब्दशः भाषांतर वाटते. त्यातल्या कृत्रिमतेमुळे भाषेला अजिबात ओघ येत नाही.
उदा.
१) 'जपान हाही अतिमहत्वाकांक्षी आणि लोभी होता व त्यांची इच्छा आशिया खंडात आपले साम्राज्य उभारण्याची होती. त्यांच्या हेतूच्या कण्याचा (??) ब्रिटन, फ्रांस आणि अमेरिकी साम्राज्यवाद्यांशी संघर्ष झाला' किंवा 'प्रचारक आणि जाहिरात करणाऱ्यांची अप्रकट संगती तर सर्वश्रुतच आहे' अशी वाक्यं वाचताना तर मिठात खडा पडल्यासारखं वाटतं राहतं. पुस्तकाचे संपादनही नीट झाल्यासारखे वाटत नाही. सदोष वाक्यरचना आणि काही मुद्रणदोष यांच्यामुळे हा मराठी अनुवाद सुखद अनुभव देत नाही. एका महत्वाच्या पुस्तकाला अशा गोष्टींमुळे उणेपण आले आहे.
कदाचित मूळ इंग्रजीतूनच हे पुस्तक वाचणे अधिक सोयीचे ठरेल.
ख्यातनाम इतिहासकार (‘Eminent Historians - Their Technology, Their Line, Their Fraud’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद)
लेखक : अरुण शौरी
अनुवादक : सुधा नरवणे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती : पहिली (२००१)
किंमत : १५० रू.
पृष्ठसंख्या :२१६